जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा गौरवगडचिरोली : जिल्हाभरातील आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, तसेच माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित सर्वोत्कृष्ट आशा व गटप्रवर्तक स्वयंसेवकांचा सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, डॉ. किशोर वाघ, डॉ. अनुपम महेशगौरी आदी उपस्थित होते. यावेळी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी आशांच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी मोलाची मदत झाली. प्रत्येक गावात आशा स्वयंसेविका नियुक्त करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, संचालन माया बाळराजे यांनी केले तर आभार सोनाली जोगदंडे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)प्रतिभा सोनुले, अल्का भंडारे ठरल्या सर्वोत्कृष्ट आशासर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून प्रतिभा मनोहर सोनुले यांची जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तर द्वितीय पुरस्काराच्या मानकरी अल्का गिरीधर भंडारे या ठरल्या. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रोख सहा व आठ हजार रूपये व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना प्रथम व द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४५ आशा स्वयंसेवकांना प्रत्येकी एक हजार रूपये पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय गट प्रवर्तकांना प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करा - संपदा मेहता
By admin | Updated: March 9, 2016 02:21 IST