गडचिरोली : ग्राम उदय ते भारत उदय या उपक्रमांतर्गत जागतिक पंचायत दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात जिल्ह्यातील २९ अनुसूचित जमातीच्या महिला सरपंच सहभागी होणार असून रविवार १७ एप्रिल रोजी त्यांना रवाना करण्यात आले आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या महिला सरपंच आहेत. यातील निवडक व इच्छूक महिला सरपंचाना पाठविण्यात येत असून त्यांची संपूर्ण व्यवस्था शासनस्तरावरुन करण्यात येणार आहे.या संमेलनात देशभरातील महिला सरपंच सहभागी होणार असून या संमेलनात पंचायत राज व्यवस्थेवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचा हा उपक्रम असून देशभरातील अनुसूचित जमातीच्या महिला सरपंचांना पाचारण करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातून २९ महिला सरपंचांना गडचिरोली पंचायत समितीमधून रवाना करण्यात आले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या महिला सपरंचांच्या चमूला उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) एस. आर. धनकर, देसाईगंजच्या गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भैय्याजी मुद्दमवार, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, ग्रामसेवक जीवनदास ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
राष्ट्रीय परिषदेत आदिवासी महिला सरपंच सहभागी होणार
By admin | Updated: April 18, 2016 03:52 IST