एटापल्ली : भामरागड वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या एटापल्ली वनपरिक्षेत्रात एटापल्लीपासून अवघ्या एक किमी अंतरावर झाडे तोडून अतिक्रमण केले जात आहे. मात्र वन विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. डुम्मे नाल्यावरील जंगलातील खंड क्र. ३७८ च्या जंगलात येन, मोह, धावळ आदी प्रकारची वृक्ष आहेत. या वृक्षांची तोड करून अतिक्रमण केले जात आहे. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. घटनेची माहिती काही नागरिकांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिली असता, हा परिसर आपल्या कक्षात येतो की नाही हे वन कर्मचाऱ्यांनाही माहीत नव्हते. एटापल्ली बिटातील वनपाल गोनाडे व वनरक्षक किरमे यांनी नकाशा व दिशादर्शक मशीन सोबत घेऊन मापन केले असता सदर भाग एटापल्ली बिटामध्ये येत असल्याचे उघडकीस आले. तालुकास्थळापासून अवघ्या एक किमी अंतरावरची झाडे तोडली जात असताना वन विभागाचे कर्मचारी गप्प असल्याबाबत नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत. तालुक्यात आंध्रप्रदेश, हरियाणा या राज्यातून काही व्यवसायिक येथील नागरिकांना भाड्याने देत आहेत. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून जंगलाची तोड केली जात आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास काही दिवसातच जंगल उजाड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन विभागाचे कर्मचारी दरदिवशी जंगलात जाऊन पाहणी करतात व तसा रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करतात. दरदिवशी पाहणी केली जात असताना जंगलतोड झाली कशी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाडे तोडून अतिक्रमण
By admin | Updated: April 20, 2015 01:31 IST