देसाईगंज : स्थानिक फवारा चौकातील बाल गणेश उत्सव मंडळाने सामाजिक बांधीलकी जोपासत मागील तीन वर्षापासून रक्तदान, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता आदी उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकीचा वसा कायम ठेवला आहे. सर्वसामान्यांकडून वर्गणी घेऊन त्या पैशाचा वारेमाप खर्च करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबविण्याकडे या मंडळाचा कल आहे़ मागील वर्षी बाल गणेश मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते़ यावर्षी देखील रक्तदान व रोगनिदान शिबीराचे आयोजन मंडळाने केले आहे़ डीजेसारख्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या प्रक्षेपणापासून हे मंडळ दूर आहे. विशेष म्हणजे विसर्जनातदेखील डीजेचा वापर करणे या गणेश मंडळाने टाळले आहे़ मंडळातर्फे दरवर्षी नवीन कार्यकारिणी ठरविण्यात येते़ त्यामुळे मंडळातील प्रत्येक सदस्य स्वत:च्या संकल्पनेनुसार काम करीत असतो.़ सदस्य नोंदणी शुल्काव्यतिरिक्त बाजारपेठेतून वर्गणी गोळा केली जाते़ वर्गणीतील पैशाचा इतरत्र अवाढव्य खर्च होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाते़ समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. सामाजिक उपक्रम राबविताना प्रत्येकाच्या संकल्पनांचा विचार केला जातो़ सार्वजनिक गणेशोत्सवातून धार्मिक श्रद्धा पाळत असतांनाच वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता आदीसह अन्य विविध सामाजिक उपक्रम राबवून बाल गणेश मंडळाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बाल गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)
सामाजिक बांधिलकीची परंपरा
By admin | Updated: September 2, 2014 23:45 IST