कांचनपूरनजीकची घटना : दोन्ही पाय तुटलेआष्टी : मुलचेरा तालुक्यातील सिंगनपेठ येथून नवसाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने मार्र्कं डा (कं.) येथे परत येताना कांचनपूर फाट्याजवळ ट्रॅक्टरने मागून दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.सुंदरा दिवाकर चापले (५५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सुंदरा चापले ही आपला मुलगा कुणाल चापले (३०) याच्यासोबत दुचाकीने सिंगनपेठ येथे नवसाच्या कार्यक्रमासाठी गेली. नवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर स्वगावी मार्र्कंडा (कं.) कडे परत येताना एमएच-३३-व्ही-३३४६ क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जबर धडक दिली. यात सुंदरा चापले हिचे दोन्ही पाय ट्रॅक्टरच्या समोरच्या चाकाखाली आल्याने तुटले. तिला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र सुंदरा चापले हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला रुग्णवाहिकेने चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अहेरी येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने जखमी सुंदरा चापले यांच्या सोबत गोंडपिपरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेण्यात आले. अपघातग्रस्त ट्रॅक्टर हिमांशू मिश्रा रा. लगाम यांच्या मालकीचा आहे. या अपघातात दुचाकीवरील कुणाल चापले हा किरकोळ जखमी झाला आहे. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. सध्या लग्न हंगाम सुरू असून विविध कार्यक्रमाची रेलचेल जोरात सुरू आहे. परिणामी जिल्ह्याच्या सर्वच मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. गेल्या महिनाभरापासून आष्टी परिसरासह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, महिला गंभीर
By admin | Updated: April 28, 2016 01:05 IST