कोंढाळा जंगलातील घटना देसाईगंज : मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमाला पट्टेदार वाघाने ठार केल्याची घटना बुधवारी कोंढाळा जंगल परिसरात घडली. लवा कुकसू मेश्राम रा. कोंढाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. लवा मेश्राम हा बुधवारी सकाळी ६ वाजता मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेला होता. बराचवेळ होऊनही तो घराकडे परत आला नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्याचा दिवसभर शोध घेतला. बराचवेळा शोध घेऊनही त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर जंगल परिसरात शोध घेतला असताना त्याचा मृतदेह आढळून आला. लवा मेश्राम याचा उजवा हात वाघाने पूर्णपणे खाल्ला होता. मोहाच्या झाडाखालून मृतदेह जंगलात ओढत नेले. याबाबतची माहिती पोलीस व वन विभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी चांदेवार, वनरक्षक किशोर माडावार, मुखरू किनेकर, नितीन गडपायले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यानेच लवा मेश्राम यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीही वाघाने जनावरांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. (वार्ताहर)
वाघाच्या हल्ल्यात इसम ठार
By admin | Updated: April 6, 2017 01:40 IST