कोरची-बेडगाव मार्ग रोखला : घरकुलाचा लाभ न देता निधी हडपल्याचे कोचीनारातील प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्ककोरची : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत कोचीनारा ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांनी घरकूल कामात भ्रष्टाचार केला. या मुद्यावर लाभार्थी व ग्रामस्थ आक्रमक होऊन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात गुरूवारी कोरची-बेडगाव मार्गावर तब्बल तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.ग्राम पंचायत सदस्य रघुराम देवांगण यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या माहितीनुसार कोचीनारा येथील १० लाभार्थ्यांना सन २०१३-१४ मध्ये घरकूल मंजूर करण्यात आले. कागदोपत्री घरकुलाची पूर्ण रक्कम उचल करून सरपंच व ग्रामसेवकांने भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ग्रामसेवक मानवटकर, सरपंच बबीता घावळे, उपसरपंच तिलक, बागडेरिया यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी घरकूल लाभार्थी व ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना तक्रार दिली होती. या बाबीला महिनाभराचा कालावधी उलटूनही दोषींवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. सदर चक्काजाम आंदोलन तीन तास चालले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व जि. प. सदस्य अनिल केरामी, काँग्रेसचे अध्यक्ष श्यामलाल मडावी, उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, पं. स. सदस्य कचरिबाई काटेंगे, पं. स. सुशिला जमकातन आदींनी केले. यावेळी सीयाराम हलामी, हिरा राऊत, नंदकिशोर वैरागडे, हर्षलता भैसारे, शालिक कराडे, रूखमन घाटघुमर, राहुल अंबादे, कांताराम जमकातन, निर्मला कराडे, उर्मिला बढईबंश, पंचबती सोनबरसा, येशुला सहारे, उषा देवांगण, हेमीन देवांगण, अमरिका देवांगण, रेखा जोगे, सरिता भक्ता, कामिनी भक्ता, रामबाई बघवा, खोरबाहरा नायक, समशेर खॉ पठाण, भीमराव कराडे, वसंत भक्ता, चतूर भेणी, किशोर कराडे, गिरधारी देवांगण, रघुराम देवांगण आदींसह शेकडो महिला व पुरूष उपस्थित होते. त्रिसदस्यीय समिती करणार चौकशी- बीडीओंचे आश्वासनकोचीनारा ग्राम पंचायतीमध्ये घरकूल बांधकामाच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीस्तरावर तीन सदस्यीय समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीमार्फत ५ जुलैला सदर प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार करणार, असे आश्वासन कोरचीचे संवर्ग विकास अधिकारी वैरागडे यांनी दिले. त्यामुळे आता त्रि सदस्यीय समितीमार्फत घरकूल प्रकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार आहे. यावेळी चर्चेदरम्यान नायब तहसीलदार डोंगरे व पं. स. चे अधिकारी उपस्थित होते. सदर आश्वासनानंतर ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले. आंदोलनादरम्यानची परिस्थिती कोरची पोलिसांनी हाताळली.
कोरचीत तीन तास चक्काजाम
By admin | Updated: June 30, 2017 01:01 IST