सिरोंचातील घटना : आरोपींमध्ये एका खासगी डॉक्टरचा समावेशसिरोंचा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वर वन विभाग व पोलीस यांच्या संयुक्त गस्तीदरम्यान पिशव्यांमध्ये जंगली खवल्या मांजराची खवले घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना तसेच ज्याच्यासाठी खवले नेण्यात येत होती, अशा एका खासगी डॉक्टरांसह तिघांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. समय्या चंद्रय्या गोटा (३२) रा. तिमेड, बकय्या सुबय्या जव्वा (२०) रा. संड्रापल्ली ता. भोपालपट्नम जि. बिजापूर (छत्तीसगड) व प्रफुल प्रयुक्त दास रा. आसरअल्ली अशी आरोपींची नावे आहेत. वनाधिकारी व पोलिसांनी समय्या गोटा व बकय्या जव्वा यांच्याकडून आठ किलो ५० ग्रॅम वजनाचे खवल्या मांजराची खवले जप्त केली. सदर खवले प्रफुल दास नामक खासगी डॉक्टराला नेऊन देणार होतो, अशी माहिती दोन्ही आरोपींनी दिली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना ५ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी ए. डी. करपे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
खवले मांजर तस्करीप्रकरणी तिघांना वनकोठडी
By admin | Updated: August 2, 2015 01:34 IST