मोसम येथील घटना : विद्युत तारेचा प्रवाह लावून केली शिकारआलापल्ली : आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वन परिक्षेत्रातील मोसम गावानजीक शनिवारी पहाटेच्या सुमारास जीवंत विद्युत प्रवाह लावून सस्यांची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी साहित्यांसह रंगेहात पकडले. श्यामराव चिंचोळकर, विश्वेश्वर मडावी, सखाराम पोरतेट असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अहेरी वनपरिक्षेत्रातील सिरोंचा मुख्य मार्गावरील जंगलालगत असलेल्या रमेश कुळमेथे यांच्या शेतात ११ केव्ही विद्युत लाईनचे विद्युत तार टाकून सस्यांची शिकार करीत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. एस. आत्राम यांनी आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार यांच्या सहकार्यातून सापळा रचला. वन कर्मचाऱ्यासंह दोन्ही वनाधिकाऱ्यांनी संबंधित परिसरात रात्रभर पाळत ठेवली. दरम्यान पहाटे ५ वाजताच्या सुमारास शामराव चिंचोळकर, विश्वेश्वर मडावी व सखाराम पोरतेट हे तिघेजण ससे नेण्यासाठी दाखल झाले. या तिघांना तत्काळ रंगेहाथ अटक करण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून एक जीवंत ससा, एक मृत ससा, लोखंडी तार व तार गुंफण्यासाठी खुंट्या आदी साहित्य जप्त केले. तिन्ही आरोपींवर भारतीय वन्यजीव, वन्यप्राणी अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी वनकोठडीत करण्यात आली.सदर कारवाई आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी यांच्या नेतृत्वात चंदू सडमेक, नितीन गेडाम, एम. आर. मुक्तेवार आदी वन कर्मचारी, वनमजूर तसेच वन व्यवस्थापन समिती मोसमचे अध्यक्ष श्रीनिवास राऊत आदींनी केली. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असू शकतो, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत गस्ती राबविणारा वन व्यवस्थापन समितीचा एक सदस्य जीवंत विद्युत तारेच्या प्रवाहात जखमी झाला असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)अहेरी वन परिक्षेत्रात कुठेही अवैध कामे होऊ नये, याकरिता मी व माझे सहकारी सदैव तत्पर राहत असून आम्ही आळीपाळीने गस्त घालीत आहो. अवैध कामाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. मोसम येथील सस्याच्या शिकार प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश आहे काय हे शोधण्यात येईल.- पी. एस. आत्राम, वन परिक्षेत्राधिकारी अहेरी
सशांची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना रंगेहात पकडले
By admin | Updated: November 29, 2015 02:09 IST