प्रशासकीय मान्यता : बांधकामासाठी ५ कोटी ५२ लक्ष रूपयांची तरतूददिलीप दहेलकर - गडचिरोलीशेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान्याची साठवणूक होऊन त्यांना योग्य भाव मिळावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत गतवर्षीपासून एकात्मिक कृती आराखड्यांतर्गत ग्रामीण कृषी गोदाम बांधकामाची योजना राबविली जात आहे. गतवर्षी २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील ११ तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या गावात २५ कृषी गोदाम बांधकामे मंजूर करून ती पूर्ण करण्यात आली. यंदा २०१३-१४ या वर्षात एकात्मिक कृती कार्यक्रमांतर्गत २८ नव्या ग्रामीण कृषी गोदाम बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. सदर बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बांधकामासाठी ५ कोटी ५२ लाख ३६ हजार रूपयाची तरतूद झाली आहे. गोदाम निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.यंदा २०१३-१४ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या २८ गोदाम बांधकामामध्ये गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, गुरवळा, बोदली, आरमोरी तालुक्यातील विहिरगाव, कुरखेडा तालुक्यातील सोनसरी, धमदीटोला, गुरनोली, देसाईगंज तालुक्यातील चोप, धानोरा तालुक्यातील कारवाफा, मेंढा, जामगिरी, आमगाव, गणपूर, फराडा, भेंडाळा, कोनसरी, विक्रमपूर, मुलचेरा तालुक्यातील लगाम, बोलेपल्ली, अहेरी तालुक्यातील किष्टापूर (आलापल्ली), पेरमिली, एटापल्ली तालुक्यातील गेदा, भामरागड तालुक्यातील लाहेरी, कोठी व सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलरावपेठा, कोठापल्ली, जाफराबाद आदी ग्रामपंचायतीच्या गावातील कृषी गोदामांचा समावेश आहे. गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी आदी तालुक्यातील कृषी गोदाम बांधकामासाठी १९ लाख ४४ हजार रूपयाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच भामरागड, सिरोंचा तालुक्यातील कृषी गोदाम बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख ५२ हजार रूपयाचा खर्च येणार आहे. या नवीन २८ गोदाम बांधकामाला जिल्हाधिकारी यांनी ४ मार्च २०१४ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या गोदाम बांधकामासाठी केंद्र शासनाकडून एकात्मिक कृती आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध होणार आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधीत कंत्राटदारांना कामाचे आदेश दिल्यानंतर या सर्व नवीन गोदामाचे बांधकाम सुरू होणार आहे. सदर गोदाम बांधकाम एक एकरपेक्षा अधिक जागेत होणार आहे. या गोदाम परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कृषी सहायकासाठी कक्ष निर्माण करण्यात येणार आहे.
२८ नवे कृषी गोदाम होणार
By admin | Updated: October 29, 2014 22:48 IST