गडचिरोली : नगर परिषदेने बाजारात पार्किंगची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. मात्र रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क म्हणून प्रत्येकी ३ रूपये आकारले जात आहेत. यामुळे वाहनधारकांमध्ये नगर परिषद व ठेकेदाराविषयी कमालीचा संताप निर्माण झाला आहे. शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. ग्रामीण भागासह शहरातील हजारो नागरिक भाजीपाला घेण्यासाठी दुचाकी वाहनाने बाजारात जातात. नगर परिषदेने वाहने पार्किंगची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे नागरिकांना वाहने राज्य महामार्गाच्या बाजूला उभी करावी लागतात. दोनही बाजूला उभी असलेली वाहने, बाजाराला येणारे हजारो नागरिक, या मार्गाने ये- जा करणारी जड वाहने व बाजूलाच थाटण्यात आलेली दुकाने यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. यामुळे एखादा अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेच्यावतीने पार्किंगची कोणतीही व्यवस्था केली गेली नसली तरी बाजारात येणाऱ्या वाहनांकडून पार्किंग शुल्क आकरल्या जात आहे. यातून नगर परिषद व ठेकेदाराला पैसा मिळत असला तरी वाहनाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हमी दिली जात नाही. प्रत्येक वाहनधारकाकडून ठेकेदाराची माणसे प्रत्येकी ३ रूपये वसूल करीत आहेत. ठेकेदार करवसूली करीत असेल तर त्याच्याकडे पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे शुल्क आकारणारी मुले वाहन घेऊन जातेवेळी शुल्क वसूल करतात. त्यामुळे एखादेवेळी वाहन चोरी झाल्यास चिट्टीच राहत नसल्याने ठेकेदार नामानिराळा राहतो. आठवडी बाजारात ४ ते ५ वाहतूक पोेलीस नियुक्त करण्यात येत असले तरी सदर वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. नगर परिषदेने पार्किंग शुल्क जरूर आकारावा मात्र पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)
पार्किंगची व्यवस्था नाही मात्र वसुली जोरात
By admin | Updated: October 12, 2014 23:33 IST