वैदू संमेलन व वनौषधी कार्यशाळा : सुनील मानकीकर यांचे प्रतिपादनगडचिरोली : जिल्ह्यात विविध प्रकारची सुगंधीत व औषधी वनस्पती आहे. या वनौषधीचा योग्य वापर करून मानसाचे आयुष्य वाढविता येते. मात्र यासाठी वनौषधीचा शास्त्रशुध्द वापर व्हावा, असे प्रतिपादन इंडो इंस्त्राईल कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील मानकीकर यांनी केले. गडचिरोली वनविभागांतर्गत येथील मध्यवर्ती काष्ठ भांडाराच्या आवारात आयोजित सुगंधी व औषधी वनस्पती कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला, सिरोंचाचे उपवनसंरक्षक शुक्ला, देसाईगंजचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक पाटील, ग्राम विकास अधिकार प्रदीप देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आत्माचे संचालक अनंत पोटे म्हणाले, पिवळ्या धोतऱ्याची साल कुटून काळा पिल्यास चावलेला विंचू उतरतो. बेडकीचा पाला मधुमेह रोगावर गुणकारी आहे. तर नरक्या वनस्पतीचा वापर कॅन्सरसाठी होतो. जिल्ह्यातील आदिवासी वनव्याप्त भागात राहत असून रोगांसाठी हे लोक वनौषधीचा अधिकाधिक वापर करतात. त्यामुळे इतर नागरिकांच्या तुलनेत आदिवासी नागरिक सुदृढ आहेत. आयुर्वेदिक औषध अधिक उपयुक्त व्हावे, याकरीता आयर्वेदिक औषधीची मात्रा निश्चित व्हायला पाहिजे. तसेच वनौषधीच्या शास्त्रशुध्द वापराबद्दल जिल्ह्यातील वैदुंना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असेही अनंत पोटे यावेळी म्हणाले. याप्रसंगी मुख्यवनसंरक्षक टी. एस. के. रेड्ड यांनी मार्गदर्शन केले. तसेच अनेक वैदुंनी वनौषधीच्या वापराबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सुनिल पेंदोरकर, प्रास्ताविक डॉ. प्रशांत भरणे यांनी केले. कार्यक्रमाला जवळपास दीडशेहून अधिक वैदू व वनकर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
वनौषधीचा शास्त्रशुध्द वापर व्हावा
By admin | Updated: November 30, 2014 23:03 IST