वैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी दोन दरवाजाचे कुलूप फोडून विद्युत साहित्याची चोरी केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री वीज वितरण कार्यालयाच्या समोरच्या प्रवेशद्वारे कुलूप फोडले. तसेच बाजुलाच असलेल्या विद्युत अभियंत्याच्या कक्षाच्या दरवाजाचे कुलूप फोडले. येथे असलेले संगणक व इतर विद्युत साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. तसेच या ठिकाणी असलेले कपाट फोडून विद्युत बजवार पट्ट्या ३ नग, फ्यूज वायर १२ नग, टार्च ३ नग, नट खोलण्याचे पाने २ नग, रिंगपाना १, पेंचिस ७ नग असा एकूण १६ हजार २८० रूपयाचा ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळच्या सुमारास विद्युत तंत्रज्ञ विलास पाटील हे सकाळी ९.३० वाजाताच्या सुमारास कार्यालयात आले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. विलास पाटील यांनी तत्काळ या घटनेची माहिती महावितरणचे अभियंता मून यांना दिली. त्यानंतर लगेच अभियंता मून यांनी या घटनेची माहिती आरमोरी पोलीस ठाण्याला कळविली. आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एन. बी. बच्चलवार, सहायक फौजदार प्रल्हाद उंदीरवाडे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. (वार्ताहर)
वैरागड वीज कार्यालयात चोरी
By admin | Updated: September 20, 2014 23:50 IST