लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणात होणारी सागवानाची तस्करी तेलंगणा वनविभागाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. तेलंगणातील चेन्नूर तालुक्यातील कोटापल्लीच्या जंगलात धाड टाकून सुमारे दोन लाख रूपये किमतीच्या सागवानी पाट्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर सागवान सिरोंचा तालुक्यातील आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची सीमा गोदावरी नदीमुळे विभागली आहे. गोदावरी नदीला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, नडीकुडा, कोत्तापल्ली, रंगधामपेठा या परिसरात देशातील सर्वोत्कृष्ट सागवानाचे जंगल आहे. या सागवानी लाकडांना तेलंगणा व इतर राज्यातही मोठी मागणी आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील वनतस्कर, गोदावरी नदीचा आधार घेत सिरोंचातील जंगलात प्रवेश करतात. मागील आठ दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या कालावधीत सिरोंचातील वनकर्मचारी जंगलात गस्तीवर येत नाही. याचा फायदा घेत तेलंगणातील वनतस्करांनी आसरअल्ली परिसरातून लाकूड तोडले. ते गोदावरी नदी पार करून तेलंगणा राज्याच्या हद्दीतील जंगलात ठेवले होते. ही बाब तेलंगणाच्या वन कर्मचाऱ्यांना कळल्यानंतर त्यांनी धाड टाकून सागवानी लाकूड जप्त केले. मात्र या कारवाईत एकही वनतस्कर सापडला नाही.
तेलंगणाच्या वन विभागाने जप्त केले महाराष्ट्रातील सागवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 13:11 IST
गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणात होणारी सागवानाची तस्करी तेलंगणा वनविभागाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
तेलंगणाच्या वन विभागाने जप्त केले महाराष्ट्रातील सागवान
ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातून तस्करी गोदावरीच्या काठावरील कारवाई