शिक्षणाधिकाऱ्यांचा गुप्त दौरा : अनेक शाळा बंद; शिक्षकही आढळले अनुपस्थितगडचिरोली : प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सोमवारी धानोरा तालुक्यात गुप्त दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी १८ ते २० शाळांची पाहणी केली. यात काही शाळा बंद अवस्थेत दिसल्या, काही शाळा दुपारी बंद करण्यात आल्या, अनेक शिक्षकही अनुपस्थित होते, या सर्व दौऱ्याचा अहवाल तयार होणार असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कामचुकार शिक्षकांच्या निलंबनाचे प्रस्ताव तयार करण्याच्या हालचालीला वेग आला आहे. यामुळे कामचुकार शिक्षकांवर कारवाई होण्याचे दाट संकेत आहेत.बालकाचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य आदी सुविधांचा लाभ देणे बंधनकारक आहे. शिक्षकांनीही शिक्षणाच्या अधिनियमाला अनुसरून आपले कर्तव्य पार पाडावे, अशी कायद्यात तरतूद आहे. एकही मुलगा शाळाबाह्य राहू नये, यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या व उपस्थिती वाढावी, यासाठी जि. प. शिक्षण विभागामार्फत नवागतांचे स्वागत व भरती पंधरवडा राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळांमधून हजारो विद्यार्थी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र नक्षल समस्येचा बाऊ करून तसेच अतिदुर्गम भागाचा विचार करून काही शिक्षक शाळेला दांडी मारीत असल्याची गुप्त माहिती शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या कानावर पडली. उल्हास नरड यांच्या कार्यकाळापूर्वी धानोरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आदी अतिदुर्गम तालुक्यातील अनेक शाळांमधील शिक्षक रजा न घेता परस्पर गैरहजर राहत असल्याचे दिसून आले होते. शिक्षकांच्या अशा पावित्र्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे बोलल्या जात आहे.जिल्ह्यातील शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा वाढावा यासाठी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी जि. प शिक्षण व शालेय प्रशासन कडक केले आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी त्यांनी धानोरा तालुक्यात पहिला गुप्त दौरा केला. दौऱ्यादरम्यान त्यांनी जांभळी, साखेरा, खुटगाव, मेंढा, कारवाफा, येडमपायली, फुलबोडी, चिचोडा, झरी, कटेझरी, पेंढरी, ढोरगठ्ठा, गट्टा, झाडापापडा आदींसह १८ ते २० शाळांना भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी नरड यांनी छत्तीसगडच्या सीमेपर्यंत सोमवारी गुप्त दौरा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या दौऱ्यादरम्यान अनुपस्थित आढळून आलेल्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी कंबर कसली आहे. निलंबनाचे प्रस्ताव तयार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे सादर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याच्या हालचालीला जि. प. च्या शिक्षण विभागात वेग आला आहे. यामुळे जिल्हाभरातील शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. कामचुकार शिक्षकांच्या कारवाईकडे शिक्षक, पालकांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षकांवर कारवाई होणार?
By admin | Updated: July 8, 2014 23:28 IST