आंदोलनाचा इशारा : अहेरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनअहेरी : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. सदर समस्या निकाली काढण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या वतीने ४ जुलैपासून पं. स. समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासंदर्भात १९ मे रोजी निवेदन सादर करून तत्काळ समस्या निकाली काढण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु त्यांनतरही शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यात आल्या नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रशासनाविरोधी तीव्र रोष व्यक्त होत आहे. येत्या आठ दिवसांत समस्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन समितीला देण्यात यावे, अन्यथा समितीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी ४ जुलैपासून पं. स. कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष किशोर सुनतकर, जिल्हासचिव अशोक दहागावकर, श्रीनिवास जक्कोजवार, श्रावण दुर्गे, ओमप्रकाश गर्गम, सुधाकर टेकूलवार, दिवाकर मादेशी, सीता टेकूलवार यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)या आहेत प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यामे २०१५ चे वेतन त्वरित देण्यात यावे, २००७- ०८ या सत्रातील स्वयंपाकगृह बांधकामाचे अंतिम देयक आठ वर्षांपासून अप्राप्त असल्याने ते त्वरित निकाली काढावे, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी खात्यात जमा करावी, उन्हाळी सुटीतील प्रोत्साहन व वाहन भत्ता कपात करू नये, असभ्य वर्तणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, दर महिन्याचे वेतन १ तारखेला द्यावे, थकीत वेतन त्वरित निकाली काढावे, शिक्षकांचे कर्जाचे हप्ते दहा दिवसांच्या आत बँकांना पाठवावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
शिक्षक करणार उपोषण
By admin | Updated: July 3, 2015 01:43 IST