शेतकऱ्यांचे हाल : खरिपाच्या तोंडावर सातबारा मिळेनावैरागड/आष्टी : जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. २६ एप्रिलपासून तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी साऱ्याच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय कुलूपबंद झाले आहेत. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सातबारा व गाव नमूना आठ अ प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांची प्रचंड पंचाईत होत आहे. १५ दिवसांवर खरीप हंगाम येऊन पोहोचला आहे. दुष्काळ परिस्थितीवर मात करून पुन्हा नव्या उमेदीने सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेऊन खरीप हंगामात धान व इतर पिकांची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र पीक कर्जासाठी बँका व सहकारी संस्था सर्वच शेतकऱ्यांना सातबारा व गाव नमूना आठ अ प्रमाणपत्राची मागणी करीत आहेत. मात्र तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या आंदोलन व संपामुळे सातबारा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी संपूर्ण जिल्हाभरात पीक कर्जाची प्रक्रिया रखडली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सातबारा व गाव नमूना आठ अ प्रमाणपत्राअभावी शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यास यंदा विलंब होणार आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (वार्ताहर) विद्यार्थ्यांचीही अडचणसन २०१६-१७ या सत्रातील शाळा, महाविद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तलाठ्यांकडून मिळणारे रहिवासी व उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी संबंधित तलाठी कार्यालयाकडे चकरा मारीत आहेत. मात्र तलाठी संपावर गेल्यामुळे विद्यार्थी प्रचंड अडचणीत सापडले आहेत.
तलाठी कार्यालय झाले कुलूपबंद
By admin | Updated: April 28, 2016 01:03 IST