दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने राष्ट्रीय महामार्गावर बसलेल्या गुरांच्या कळपाचा फोटो प्रकाशित करून या समस्येकडे लक्ष वेधले होते. गडचिरोली शहरात, आष्टी, चामोर्शीसह अहेरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे मुख्य रस्त्यांवर रात्री बसलेली असतात. यातून काही ठिकाणी अपघातही झालेले आहेत. नागरिक तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी याबाबत तोंडी तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली शहरासह आष्टी, चामोर्शी, अहेरी या भागातील मोकाट जनावरांबाबत विचार व्हावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकारी सिंगला यांनी संबंधित विभाग प्रमुखांना मोकाट जनावरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक एन.कुमारस्वामी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.