जिल्हा सामान्य रुग्णालयात नवनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी काय व्यवस्था करण्यात आली, याबाबतची पाहणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात जाऊन केली. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, सदस्य राम रतन गोहने व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे,
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, डॉ. माधुरी किलनाके आदी हजर हाेते.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेषता ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा नाहक जीव जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सांभाळणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था रुग्ण कल्याण समितीमार्फत तातडीने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, याअंतर्गत असणाऱ्या रुग्ण कल्याण समितीकडे १.५० लक्ष रुपये खर्चाकरिता असतात असून तर जिल्ह्यात ३ उपजिल्हा रुग्णालय तर ९ ग्रामीण रुग्णालये असून, याअंतर्गत असणाऱ्या रुग्णकल्याण समितीकडे २.५० लक्ष रुपये खर्चाकरिता असतात. जिल्ह्यात अशी मोठी आरोग्य यंत्रणा व त्याकडे निधी उपलब्ध असतानाही केवळ ऑक्सिजनची व्यवस्था होत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने सर्व रुग्णांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जात असून, अतिरिक्त ताण पडत असल्याने जिल्हा रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान १० ऑक्सिजन सिलिंडर तर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये किमान २० ऑक्सिजन सिलिंडर व किमान २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, रुग्ण कल्याण समितीमार्फत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार डॉ. होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.