भामरागडातही गर्दी वाढली : हेमलकसाला दररोज दोन हजार नागरिक देत आहेत भेटगडचिरोली : वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्याच्या अरण्यभागात सध्या पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागातून पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवाळीच्या सुट्यांच्या काळात पर्यटकांच्या या गर्दीने उच्चांक गाठला. महाराष्ट्राच्या टोकाला असलेल्या भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्पाला शेकडो पर्यटकांनी भेट देऊन येथील कामाची माहिती जाणून घेतली. गेल्या काही महिन्यात दररोज दीड हजार ते दोन हजार पर्यटक हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देण्यासाठी देशाच्या विविध भागातून येत आहेत. भामरागड-आलापल्ली मार्गावर असलेल्या घनदाट जंगल परिसरातही अरण्यवाट्यांमध्ये पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. वनवैभव म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाकाय वृक्षाला पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी आहे. नुकतीच मुंबई येथील अंबरनाथ भागातील शाळकरी मुलांनीही या भागाला भेट देऊन येथील माहिती जाणून घेतली. हेमलकसा प्रकल्पातील आश्रमशाळा व वन्यजीवांच्या संगोपणासाठी कार्यरत असलेले आमटेज अॅनिमल फार्मलाही पर्यटकांनी भेट देऊन येथील कामाची माहिती जाणून घेतली. लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी येणाऱ्या सर्व पर्यटकांना याची माहिती दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे पर्यटकांचा ओढा तसा कमीच राहतो. मात्र यावर्षीच्या दिवाळीच्या सुट्या याला अपवाद ठरल्या, असे दिसून येत आहे.पर्यटकांनी दिवाळीच्या या काळात गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन येथील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली. पर्यटकांच्या दृष्टीने या भागात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्या तरी पर्यटकांचा ओढा मात्र जंगलाच्या दिशेने वाढतच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सुट्यांमध्ये मुंबई, पुणेकरांची गडचिरोलीत जंगलवारी
By admin | Updated: November 26, 2015 01:20 IST