गडचिरोली : खरीप हंगामासाठी शासनाने २९ हजार ९00 मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर केले असून त्यापैकी सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५८0७.६१ मेट्रिक टन खत उपलब्ध आहेत. खरीप हंगामाला प्रत्यक्ष सुरूवात होऊन खताचा वापर होण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकर्यांना आवश्यक तेवढे खत उपलब्ध होईल, असा आशावाद कृषी विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पादन धान पिकाचे घेतले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन, तूर, कापूस याही पिकांचे उत्पादन खरीप हंगामामध्ये घेतल्या जाते. ऐन वेळेवर खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभाग उन्हाळ्यामध्येच खत व बियाण्यांचे नियोजन करते. कापूस, सोयाबीन या पिकांची पेरणी करतेवेळीच खताची आवश्यकता भासते. सर्वसाधारणपणे सोयाबिन पिकाला एकाचवेळी खताची मात्रा दिली जात असल्याने या पिकासाठी आवश्यक असलेले खत शेतकरी खरीप हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच बियाण्यांसोबतच खरेदी करतात. धान पिकाला खत देण्यासाठी मात्र बराच कालावधी आहे. मान्सूनच्या आगमनानंतर सर्वप्रथम धानाची पर्हे टाकली जातात. पर्ह्यांची योग्य वाढ झाल्यानंतर व पाऊस पुरेसा पडल्यानंतर धान पिकाच्या रोवणीला सुरूवात होते. धान पिकाच्या रोवणीच्यावेळी खत दिल्या जाते. धान पिकाच्या रोवणीला आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे तोपर्यंत आवश्यक असलेले खत उपलब्ध होईल अशी अपेक्षा कृषी विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त युरिया या खताचा वापर केला जातो. हे खत इतर खतांच्या तुलनेत स्वस्त असल्याने या खताचा वापर करण्याकडे शेतकर्यांचा कल असल्याचे दिसून येते. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी एकूण २९ हजार ९00 मेट्रिक टन एवढय़ा खताची आवश्यकता भासते. यापैकी २0 हजार २00 मेट्रिक टन युरिया खताचा समावेश आहे. चालू खरीप हंगामासाठी २९६४.९0 मेट्रिक टन एवढा युरिया खत प्राप्त झाला होता. १९५५.९0 मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली असून प्रत्यक्षात ६५१ मेट्रीक टन खत शिल्लक आहे. युरिया खतानंतर मिo्र खतांचा वापर केला जातो. ५१00 मेट्रिक टन आवंटन या खताचे मंजूर करण्यात आले असून त्यापैकी जिल्ह्यात सद्य:स्थितीत जिल्ह्यात १५२४.८१ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. डीएपी हे खत इतर सर्व खतांपैकी अत्यंत महाग असल्याने या खताचा वापर जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात केला जातो. विशेष करून डीएपी खताचा वापर सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके यांच्यासाठी केला जातो. डीएपी खताचे १७00 मेट्रीक टन आवंटन मंजूर करण्यात आले. मागील वर्षीचे २८९ क्विंटल खत शिल्लक होते. शासनाकडून सद्य:स्थितीत डीएपी खत प्राप्त झाले नाही. त्यामुळे मागील वर्षीचेच शिल्लक असलेले खत विक्रेत्यांकडे आहे. एसएसपी खताचे २३00 मेट्रिक टन आवंटन मंजूर असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात ९0५.६0 मेट्रिक टन खत शिल्लक आहे. एमओपीचे ६00 मेट्रिक टन आवंटन मंजूर असून १२३.३0 मेट्रिक टन खत शिल्लक आहे. सर्व प्रकारचे मिळून खरीप हंगामासाठी २९ हजार ९00 मेट्रिक टन एवढे खताचे आवंटन मंजूर आहे. त्यापैकी २ हजार ७0४.९0 मेट्रिक टन खत प्राप्त झाले आहे. मागील वर्षीचे ३ हजार १0२.७१ मेट्रिक टन खत शिल्लक होते. त्यापैकी १ हजार ९५५.९0 मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली असून जिल्हाभरातील विविध खत विक्रेत्यांकडे ३ हजार ४९३.७१ एवढे खत शिल्लक आहे. आवंटनापेक्षा खताचा उपलब्ध साठा जिल्ह्यात कमी वाटत असला तरी धान पिकाला खताची मात्रा देण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत आवश्यक असलेले खत उपलब्ध होईल, असा आशावाद कृषी विभागाच्या अधिकार्यांनी वर्तविला आहे. (नगर प्रतिनिधी)