आरमाेरी : वयाची १८ वर्षे पूर्ण हाेईपर्यंत वाहन चालवू नये. त्यानंतरसुद्धा परवाना किंवा शिकावू परवाना बाळगूनच गाडी चालवावी. याशिवाय परवानाधारक चालकांनीसुद्धा साेबत परवाना, पीयूसी, विमापत्र, आरसी बुक आदी कागदपत्रे साेबत बाळगावी. अन्यथा काही दुर्घटना घडल्यास काेर्टाची पायरी चढावी लागते. बेजबाबदारपणे वाहन चालविल्यास पालक व वाहनसुद्धा अडचणीत येते. त्यामुळे वाहनाची कागदपत्रे साेबत बाळगूनच नियमानेच वाहन चालवावे, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी आर.टी. सावंत यांनी केलेे.
आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व. नसरुद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालयात ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने आयाेजित शिबिरात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ. लालसिंग खालसा हाेते. यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपप्राचार्य डाॅ. चंद्रकांत डाेर्लीकर, पीएसआय चेतन पाटील, प्रा. नाेमेश मेश्राम उपस्थित हाेते. न्या. सावंत पुढे म्हणाले, केवळ ५०० रुपये खर्च करुन ऑनलाईन परवाना काढल्यास ताे घरपाेच मिळताे. तसेच कालानुरुप ते वेळाेवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. प्राचार्य खालसा यांनी महाविद्यालयात विनापरवाना वाहने आणणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. विजय रैवतकर तर आभार प्रा. पराग मेश्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. डाॅ. सतीश काेला, प्रा. सुनील चुटे, प्रशांत दडमल यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.