आलापल्ली-अहेरी मार्ग रोखला : वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी अम्ब्रीशरावांशी साधला दूरध्वनीवरून संवादअहेरी : राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा कारभार सांभाळणारे राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थेमार्फत नागेपल्ली येथे चालविल्या जाणाऱ्या मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात अनेक समस्या असल्याने या समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना अखेर बुधवारी आलापल्ली-अहेरी मार्गावर चक्काजाम आंदोलन करावे लागले. अखेरीस पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासोबत दूरध्वनीवर आंदोलक विद्यार्थ्यांनी चर्चा करून आपल्या समस्या त्यांच्या कानी घातल्या.धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी यांच्यामार्फत अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे राजे धर्मराव मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहात ३० विद्यार्थी सध्या वास्तव्याला आहेत. हे विद्यार्थी दुर्गम व अतिसंवेदनशील भागातील असून गेल्या काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण या विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून जेवण न घेण्याचा निर्णय घेत उपवास सुरू केला. ३० विद्यार्थी असताना पुरेशे जेवण दिले जात नाही. जेवणाचा दर्जा योग्य नसल्याने व या समस्येवर पालकमंत्र्यासह कुणाकडूनच तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने अखेरीस बुधवारी ३० विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. भाजीपोळी जेवणासोबत देत नाही. वसतिगृह सुरू झाल्यापासून भाजीपोळी देण्यात आलेली नाही. भाड्याच्या खोलीत अनेक वर्षांपासून हे वसतिगृह सुरू असून स्नानगृह नाही. भांडे खराब झालेल्या अवस्थेत आहे. पिण्यासाठी पाणी विहिरीतून आणावे लागत आहे. ३० विद्यार्थ्यांना पुरेशा खोल्या नाहीत, अशा समस्या आहेत. वसतिगृहात अनेक समस्या असून वसतिगृह अधीक्षक एस. डब्ल्यू. नेहारे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. परंतु त्यांनी वरिष्ठांकडून योग्य आहार विद्यार्थ्यांना देऊ, एवढेच आश्वासन दिले. हे सर्व विद्यार्थी इयत्ता पाचवी ते दहावीत शिक्षण घेत आहेत. या समस्यांबाबत यापूर्वीही अनेकदा माहिती देण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाले. यासंदर्भात वसतिगृह व्यवस्थापक ए. डी. वाळके म्हणाले की, वसतिगृहाती विद्यार्थ्यांना यापुढे सोयीसुविधांपासून वंचित ठेवणार नाही, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
राजे धर्मराव वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे चक्काजाम
By admin | Updated: February 4, 2016 01:19 IST