दुर्वेश सोनवाने : शिवाजी हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाचा समारोप गडचिरोली : येणाऱ्या भावी पिढीचे मार्गदर्शक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधुनिकतेसोबतच सेवाभावी वृत्ती जोपासावी, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले. येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सोनवाने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव डी. एन. चापले होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष के. के. भोयर, शिक्षणाधिकारी आत्राम, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, संस्थेचे सदस्य नाना म्हशाखेत्री, के. वाय. वाघरे, प्राचार्य जी. एम. दिवटे, कैैलास शर्मा, उपमुख्याध्यापक मामीडवार, पर्यवेक्षक दिलीप उरकुडे, म्हशाखेत्री व छात्रसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरावी, भविष्यात कितीही मोठे झाले तरी आपल्या आई-वडिलांना विसरू नका, असे आवाहनही सोनवाने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिवटे, संचालन संजय निशाने, प्रा. अनिल शेट्टे तर आभार भगवान घोटेकर यांनी मानले. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनो सेवाभाव जोपासा
By admin | Updated: January 25, 2017 02:10 IST