चामोर्शी : येथील पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता नगर पंचायत उपाध्यक्ष राहूल नैताम यांच्या नेतृत्वात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शहरातून रॅली काढून पीएसआयच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात हे दोन महिन्यांपूर्वी चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये रूजू झाले. त्यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे अवैध व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी अवैध धंदे सोडूनही दिले होते. थोरात यांच्यावरील वचपा काढण्यासाठी त्यांना एका खोट्या प्रकरणात अडकवून त्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. सदर बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी ‘पीएसआय थोरात बचाव रॅली’ विद्यार्थ्यांमार्फत शहरात काढण्यात आली. सदर रॅली संपूर्ण चामोर्शी शहरातून फिरविण्यात आली. चर्चेदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनी थोरात यांची बदली रद्द केली जाईल, असे आश्वासन दिले. रॅलीचे नेतृत्व नगर पंचायत उपाध्यक्ष राहूल नैताम, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, नगरसेवक प्रशांत येगलोपवार, जयराम चलाख, रनसोड कलंत्री, अनिल भैसारे, भोजराज भगत, रतन आभारे, कैसीक बिश्वास, बंडू साखरे यांनी केले. स्वाभीमानी सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, खा. अशोक नेते यांना सुध्दा निवेदन पाठविले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष अवदूत चलाख, प्रकाश सहारे, क्रिष्णा नैताम, दिवाकर कोहळे, संतोष बुरांडे, राजू धोडरे, विलास नैताम, हनुमंत डंबारे, पुरूषोत्तम उंदीरवाडे उपस्थित होते.यापूर्वी चामोर्शी येथील काही नागरिकांच्या वतीने आ. डॉ. देवराव होळी यांना निवेदन सादर करून पीएसआय थोरात यांची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता विद्यार्थ्यांनी धरणे दिले. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:04 IST