खासदारांचे आवाहन : बीएसएनएलच्या कामकाजाचा सभेत घेतला आढावालोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित आहेत. दळणवळणाच्या साधनांअभावी जिल्ह्याचा विकास रखडला आहे. त्यामुळे दळणवळण व दूरसंचार सेवा बळकट करावी, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. दूरसंचार सल्लागार समितीची बैठक मंगळवारी बीएसएनएल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते बोलत होते. यावेळी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवणे, दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य नाना नाकाडे, राम लांजेवार, डॉ. भारत खटी, विनोद अमनपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदारांनी बीएसएनएलच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना अवगत केले. या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. ग्रामपंचायत आॅनलाईन करणे, नवीन ठिकाणी टू-जी व थ्री-जी टॉवर लावणे बीएसएनएलची कामे जिल्ह्यातीलच कंत्राटदारांना द्यावे आदी बाबतच्या सूचना केल्या. गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने खासगी कंपन्या सेवा देण्यास तयार होत नाही. त्यामुळे बीएसएनएल या एकाच कंपनीवर येथील नागरिक अवलंबून आहेत. बीएसएनएल ही केंद्र शासनाची कंपनी असल्याने नफा कमविण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडायची आहे. त्यामुळे काही ठिकाणी टॉवर उभे करताना उत्पन्नाचा विचार न करता स्थानिक विकासाला प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी सल्लागार समितीच्या सदस्यांनी सुध्दा आपापल्या भागातील समस्या मांडल्या. या सर्व समस्यांची दखल घेऊन त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवणे यांनी दिले. प्रास्ताविकातून जीवणे यांनी बीएसएनएलच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. संचालन अभियंता किशोर कापगते, तर आभार मनोज लभाने यांनी मानले.
जिल्ह्यातील दूरसंचार सेवा बळकट करा
By admin | Updated: July 5, 2017 01:18 IST