शेकडोंची उपस्थिती : धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी; परिसरातील शेतकऱ्यांचा सहभागपुराडा : कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादनात ५० टक्के घट आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे खचून गेला आहे. जिल्हाभरात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी पुराडा येथील धान खरेदी केंद्र अजुनपर्यंत सुरू झाले नाही. त्यामुळे उत्पादीत शेतमाल कुठे विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी उचलण्यास सुरूवात केली आहे. अत्यंत कमी किमतीने धानाची खरेदी केली जात आहे. शेतीसाठी घेतलेले सावकाराचे कर्ज फेडण्याची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे नायलाजास्तव धान व्यापाऱ्याला विकावे लागत आहे. धान खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने कोरची, कुरखेडा मार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन केले. सदर आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे रामचंद्र रोकडे, पुराडाचे उपसरपंच अशोक उसेंडी, बाबाराव मडावी, सरपंच रेखा ब्राह्मनायक, सकुनसिंग सोनजाल, नकुल फुलकवर, देवेंद्र मारगाये यांनी केले. आंदोलनाला परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन
By admin | Updated: December 16, 2015 01:42 IST