२४ मे राेजी तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत आशा व गट प्रवर्तक महिलांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना नोटीसद्वारे कोरोना -१९ विषयक कामावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची सूचना दिली आहे.
आशा कर्मचारी मागील एक वर्षापासून कोरोना अनुषंगाने अनेक कामे नियमित करीत आहेत. अनेकदा कोरोना सर्वेक्षणाला गेले असता त्यांच्यावर शिवीगाळ व हल्लेही झाले आहेत, कोविड प्रादुर्भावाच्या काळात सक्षम आणि समर्थपणे सेवा देणाऱ्या या कामगारांना 'कोविड योद्धा' म्हणून गौरविण्यात आले आहे. मात्र त्यांना गरजेपुरता मोबदला मिळाला नाही, तर फक्त दिवसाला ३३ रू. देऊन त्यांच्याकडून वेठबिगारीचे काम करवून घेतल्या जात आहे. काेराेना महामारीमुळे महाराष्ट्रात अनेक आशावर्करला आपले प्राण गमवावे लागले आहेत. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून व आपल्या हक्काचा दाम मिळावा म्हणून नाईलाजास्तव आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना २६ पासून कोविड कामावर बहिष्कार तर १५ जूनपासून राज्यव्यापी संप करावा लागत आहे.
गडचिरोली येथील आरोग्य कार्यालयात निवेदन देताना आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम, जयमाला सोरते, सुनिता कुमरे, वनिता मांदाडे, अर्चना जुआरे, संगीता वासेकर, कविता दर्वडे यासह तालुक्यातील आशा व गट प्रवर्तक महिला उपस्थित होत्या.
बाॅक्स....
या आहेत निवेदनातील मागण्या
राज्य सरकारने आशा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. किमान २२ हजार रुपये वेतन घ्यावे. आशा वर्करला सर्व सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी. सर्व महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामीण विभागातील आशावर्कर व गट प्रवर्तक यांना प्रतिदिन ३०० रुपये मानधन द्यावे. ग्रामविकास खात्याच्या व नगर विकास खात्याच्या शासकीय परिपत्रकानुसार ग्रामपंचायतच्या उपलब्ध निधीतून आशा व गट प्रवर्तक यांना मासिक १००० रुपये प्रोत्साहन भत्ता मागील एप्रिल २०२१ पासून फरकासहित देण्यात यावा. नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत नागरी भागातील आशा व गट प्रवर्तक महिलांना सुद्धा मासिक १००० रु. फरकासहित देण्यात यावे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा मोबदला आशा व गट प्रवर्तक यांना देण्यात यावा. राज्य शासनाच्या विमा कवच योजनेत संबंधितांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात यावा. पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग आणि सांसर्गिक रोग यांच्या सर्वेक्षणाचा थकीत मोबदला देण्यात यावा. कोरोनाबाधित झालेल्या आशा व गट प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावे व त्यांना विनामूल्य उपचार देण्यात यावा. आशा व गट प्रवर्तकांना मास्क, हॅंडग्लाेज, सॅनिटायझरची नियमित पूर्तता करण्यात यावी व ऑक्सिजन, तापमान मीटर यंत्रासाठी आवश्यक असणारे सेलही मुबलक प्रमाणात देण्यात यावे. आरोग्य सेविका पदभरतीमध्ये आशा व गट प्रवर्तक महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्या आयटक संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.