देसाईगंज : रेतीघाटात रकमेची गुंतवणूक करून कमी वेळेत जास्त नफा कमविण्याचा मार्ग रेती कंत्राटदारांना मिळाला आहे. रेतीघाटाच्या लिलावात स्वत:ची गुंतवणूक कोणत्या प्रकारे करायची याचे डावपेच आखणे कंत्राटदारांकडून सुरू झाले आहे. या व्यवसायात नवीन उमेदवाराचा प्रवेश होणार नाही, याकामीही काही रेतीघाट कंत्राटदार लागले असल्याचे दिसून येते. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या रेतीघाटाच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेती व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. रेतीघाटात गुंतवणूक केलेल्या हजारो रूपयातून लाखो रूपये कमविण्याचा गुरूमंत्र रेती कंत्राटदारांनां गवसला आहे. त्यामुळे जिल्ह्यांसह देसाईगंज तालुक्यातील कंत्राटदार रेतीघाटात पैसा गुंतविण्याकरिता सज्ज असतात. मागील वर्षात तर रेती व्यवसायाच्या नफ्याने कळस गाठले होते. कमी कालावधीत जास्त नफा कमविणे हे कंत्राटदाराच्या अंगवळणी पडले आहे. रेतीघाट लिलावात एकट्याची ताकद न पुरल्यामुळे अनेक कंत्राटदारांनी पाटर्नशिपमध्ये या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली होती. यात प्रत्येकाचा हिस्सा ठरलेला असतो. गतवर्षी झालेला अधिक नफा गुंतवणूकदारांना अधिक आकर्षित करीत आहे. मिळणारा नफा अतिशय चांगला असल्याने चालू वर्षात होणाऱ्या रेतीघाट लिलावात नवीन उमेदवार येणार नाही, याबाबत अनेक ठेकेदारांनी डावपेच आखणे सुरू केले आहे. यापूर्वी रेती व्यवसायातून अधिकचा पैसा कमविणे हे स्थानिक कंत्राटदारांना माहित नव्हते. मात्र इतर जिल्ह्यातून गुंतवणूक करणाऱ्या कंत्राटदारांनी स्थानिक कंत्राटदारांना मोठा नफा कमविण्याचा मूलमंत्र दिला आहे. त्यामुळे आता या व्यवसायात येणाऱ्या कंत्राटदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. (वार्ताहर)
रेतीघाटासाठी डावपेच सुरू
By admin | Updated: December 23, 2014 23:03 IST