अहेरी : येथे न्याय मंदिराची नवीन इमारत उभारण्यात आली असून गुरूवारी या नव्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून अहेरी उपविभागातील नागरिकांनी अहेरी येथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू व्हावे, अशी मागणी केली होती. मात्र जागा व इमारतीअभावी सदर मागणीची दखल घेण्यात आली नाही. मात्र आता अहेरी येथे न्यायालयाची प्रशस्त इमारत उभी झाली आहे. त्यामुळे आता याच इमारतीत अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड व मुलचेरा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अहेरी उपविभागातील जनतेचे खटले व प्रकरणे मोठ्या प्रमाणात न्यायप्रविष्ट आहेत. अहेरी ते गडचिरोली हे अंतर मोठे आहे. त्यामुळे प्रवासावर मोठा खर्च करून अहेरी उपविभागातील जनतेला वारंवार गडचिरोली येथे जिल्हा न्यायालयात जावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसतो. अहेरी उपविभागातील प्रकरणे व खटले मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट राहत असल्याने अहेरी येथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सन २००८-०९ मध्ये अहेरी येथे प्रायोगिक तत्त्वावर अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यात आले होते. त्यावेळी या न्यायालयात न्यायाधीश एस. व्ही. सेदाणी हे न्यायदानाची भूमिका बजावित होते. मात्र इमारतीअभावी अहेरीतील जिल्हा सत्र न्यायालय बंद झाले. (तालुका प्रतिनिधी)
अहेरीत अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करा
By admin | Updated: April 2, 2015 01:49 IST