गडचिरोली : धानोरा पंचायत समितीमधील गटसाधन केंद्रात विशेष शिक्षक (कंत्राटी) म्हणून कार्यरत असलेल्या भास्कर पुंडलिकराव इंगळे याला धानोरा येथील चाईल्ड प्रोग्रेस कॉन्व्हेंटच्या सचिवाकडून सहा हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रंगेहात पकडले. सदर सापळा इंगळे याच्या शासकीय निवासस्थानी रचण्यात आला.चाईल्ड प्रोग्रेस कॉन्व्हेंट या संस्थेने नुतनीकरणासाठी तसेच पाचव्या वर्गाची मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रस्ताव तपासणी करून वरिष्ठांकडे सादर करण्याच्या कामाकरिता भास्कर इंगळे याने सहा हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार संस्थेच्या सचिवांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांच्याकडे केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी धानोरा येथे सापळा रचला व सहा हजार रूपये घेताना रंगेहात पकडले. आरोपीच्या विरोधात कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये धानोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला व अटक केली. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त संजय दराडे, पोलीस उपअधीक्षक किशोर सुपारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यू. मंडलवार, पोलीस हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडीकवार, मिलिंद गेडाम, महेश कुकुडकर, देवेंद्र लोनबले, स्वप्नील वडेट्टीवार यांनी केली. शासकीय कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्यास याबाबत १०६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
विशेष शिक्षकाला सहा हजारांची लाच घेताना अटक
By admin | Updated: April 26, 2016 01:06 IST