हेलिकॉप्टर अहेरीतच : बिघडण्याचे कारण गुलदस्त्यात लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुख्यमंत्र्यांना ऐन नक्षलग्रस्त भागात धोका देणारे नागपूर येथील ते हेलिकॉप्टर एका खासगी कंपनीचे होते. या हेलिकॉप्टरमध्ये कसा बिघाड झाला? या प्रश्नाची उकल करण्यासाठी संबंधित तंत्रज्ञ अहेरीत दाखल झाले असले तरी शनिवारी सायंकाळपर्यंत हे हेलिकॉप्टर नागपूरकडे रवाना होऊ शकले नाही. वास्तविक जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी हलविण्यासाठी तसेच वरिष्ठ अधिकारी किंवा अतिमहत्वाच्या व्यक्तींना नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी पवनहंस कंपनीचे एक हेलिकॉप्टर जिल्हा पोलीस दलाकडे आहे. पण त्या हेलिकॉप्टरचे ‘रोटर’ बदलविण्याचे काम तसेच मासिक देखभालीचे काम सुरू असल्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात हे हेलिकॉप्टर वापरता आले नाही. हे हेलिकॉप्टर सुस्थितीत असते तर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अहेरीत बिघडल्यानंतर तातडीने गडचिरोलीवरून पोलीस दलाकडे असलेले हेलिकॉप्टर पाठवून मुख्यमंत्र्यांना नागपूरकडे रवाना करणे शक्य झाले असते. पण तसे न झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांना लांबलचक असा कार प्रवास करीत नागपूर गाठावे लागले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकावेळी सलग २७० किलोमीटरचा प्रवास कारने करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना ठरली आहे. जिल्हा पोलीस दलाकडे असलेल्या पवनहंस कंपनीच्या हेलिकॉप्टरसाठी गडचिरोलीत त्या कंपनीच्या पायलट्सपासून अभियंत्यापर्यंत सर्व आहेत. पण त्या हेलिकॉप्टरचा अशा दौऱ्यासाठी वापर करताना त्यांना पूर्वसूचना द्यावी लागते. तेव्हा ते हेलिकॉप्टर उड्डान भरण्यासाठी तयार ठेवतात. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी पवनहंस कंपनीचे संबंधित कर्मचारी या हेलिकॉप्टरच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांसाठी उपलब्ध होऊ शकले नाही.
...म्हणून मुख्यमंत्र्यांना कारने करावा लागला प्रवास
By admin | Updated: May 14, 2017 01:43 IST