गडचिरोली : जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली वनवृत्तातील सुमारे ५ हजार ७९९ वृक्षांची तोड करण्यात आली आहे. यामुळे वनविभागाचे ६४ लाख रूपयांचे एकूण नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. या जंगलाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोणातून गडचिरोली या एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र वनवृत्त कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयांतर्गत हजारो वनकर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. वनतस्करी थांबविण्यासाठी वनविभागाने अनेक उपाययोजना योजल्या असल्या तरी वनतस्करी रोखण्यात वनविभागाला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५ हजार ७९९ वृक्षांची तोड करण्यात आली आहे. यामध्ये एकट्या सागवानाची ७४३ वृक्ष आहेत. या वृक्षतोडीमुळे वनविभागाचे एकूण ६४ लाख ५५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर सागवानाच्या वृक्षतोडीमुळे ४८ लाख ८२ हजार रूपयांचे नुकसान वनविभागाला सहन करावे लागले आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे १ कोटी ८४ लाख ३९ हजार रूपयांचा सागवान जप्त केला आहे. तर ११ लाख ९ हजार रूपये किंमतीच्या इतर वृक्षांचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. हे सागवान वजनाने अत्यंत हलके व टिकावू असल्याने देशभरात या सागवानाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष करून सिरोंचा तालुक्यातील सागवान संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. नेमका हाच भाग तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून आहे. तेलंगणा राज्यातही सिरोंचाचा सागवान म्हणून प्रसिध्द आहे. यापासून बनविलेल्या वस्तुंना बाजारपेठेत ४ ते ५ पट अधिक किंमत मिळते. त्यामुळे तेलंगणा राज्यातील तस्करांकडून मोठ्या प्रमाणात वनतस्करी केली जाते. वनतस्करी रोखण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न केले जात असले तरी वनतस्करांपुढे हे प्रयत्न थिटे पडत असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)
तीन महिन्यांत सहा हजार वृक्षांची तोड
By admin | Updated: November 27, 2014 23:34 IST