ग्रामस्थांची मागणी : वादळामुळे पुरवठा खंडितआरमोरी : तालुक्यातील जांभळी येथे २७ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या वतीने अद्यापही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे सदर पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जांभळी येथील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकरणात लक्ष घालावे, याकरिता ग्रामस्थांनी माजी आ. आनंदराव गेडाम यांची भेट घेऊन गाऱ्हाणी सांगितली. त्यानंतर माजी आ. आनंदराव गेडाम यांनी अधीक्षक अभियंता म्हस्के यांच्याशी संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली. तसेच उपविभागीय कार्यकारी अभियंता आढाव यांच्याशीही भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. येत्या दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी माजी पं. स. सभापती बग्गूजी ताडाम, नरेंद्र टेंभुर्णे व जांभळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
जांभळीतील वीज पुरवठा सुरळीत करा
By admin | Updated: May 6, 2016 01:17 IST