वळूमाता संगोपन केंद्राची दुरवस्था : प्रवेशद्वारही तुटले; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरविसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा, एकलपूर गावालगत असलेल्या २१६ हेक्टरवरील वळूमाता संगोपन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या वसाहतीला गवत, झाडे झुडूपांचा वेढा पडला असून प्रवेशद्वारही तुटलेले आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शासनाने अत्यंत चांगल्या हेतूने ग्रामीण भागातील बेरोजगार, अल्पभूधारक शेतकरी यांचे आर्थिकस्तर वाढविण्याच्या उद्देशाने विसोरा, एकलपूर गावालगत वळूमाता प्रक्षेत्र स्थापन केले. या ठिकाणी गायींची निर्मिती तसेच संगोपन या दोन्ही बाबींचा समावेश आहे. या वळूमाता संगोपन केंद्रातील प्रक्षेत्र व्यवस्थापक (मुख्याधिकारी) यांच्यापासून शेवटचे कर्मचारी व मजूर येथे निवासी राहून सेवा देणे अपेक्षित होते. आताही येथील अधिकारी, कर्मचारी व मजूर निवासी राहून कामकाज सांभाळत आहेत. मात्र सध्य:स्थितीत केंद्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रभारी असून ते महिन्यातून काही दिवस येथे येऊन भेट देतात. दोन पशुधन विकास अधिकारी असून ते सुद्धा मुख्यालयी राहत नाही. येथील एक पशुधन विकास अधिकारी चंद्रपूरवरून रेल्वेने ये-जा करतात. कर्मचारी याच ठिकाणी वास्तव्यास राहून आपली सेवा द्यावी, या हेतूने शासनाने लाखो रूपये खर्च करून या केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी वसाहत निर्माण केली. कनिष्ठ कर्मचारीसुद्धा येथेच राहतात. मात्र या वसाहतीच्या सभोवताल गवत, झाडे झुडूपे वाढल्यामुळे या वसाहतीच्या इमारती दिसेनाशा झाल्या आहेत. प्रवेशद्वारही पूर्णत: तुटले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या केंद्राला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाल्याने या परिसरात शेकडोच्या संख्येत वन्यप्राण्यांचा वावर असतो. हरीण तसेच तीन ते चार बिबट या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे येथील गायी व कर्मचारी यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)
कर्मचारी वसाहतीला झुडूपांचा वेढा
By admin | Updated: September 24, 2015 01:51 IST