दिवाळीच्या तोंडावर : एसबीआयच्या एटीएमवर ग्राहकांचा भारगडचिरोली : दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ ग्राहकांनी फुलली आहे. मात्र या बाजारपेठेला रविवारी व सोमवारी सलग दोन दिवस बंद असलेल्या एटीएमचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे बँक प्रशासनाविषयी नागरिकांसह दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने या सणाला मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दिवाळीच्या या हंगामाचा फायदा उचलण्यासाठी दुकानदारवर्ग मागील एक महिन्यापासूनच तयारी करतात. दिवाळीसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य दुकानामध्ये विक्रीसाठी आणून ठेवतात. रविवारपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीची गर्दी बाजारपेठेत वाढली आहे. दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करायची झाल्यास ग्राहकाचे पाय आपोआप बँकेच्या एटीएमकडे वळतात. बँकांनी कार्यालयातील भार कमी करण्यासाठी सर्वच ग्राहकांना एटीएम कार्डचे वितरण केले आहे. त्यामुळे ग्राहक सर्वप्रथम एटीएमकडे फिरकत होते. मात्र शहरातील बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, युनियन बँक आदी बँकांचे बहुतांश एटीएम बंद होते. केवळ स्टेट बँक आॅफ इंडियाचेच एटीएम सुरू होते. त्यामुळे ग्राहकांची गर्दी एसबीआयच्या एटीएमसमोर वाढली होती. सकाळपासूनच या एटीएमसमोर ग्राहकांची गर्दी वाढली होती. एक तास लाईनमध्ये लागल्यानंतर एटीएममधून पैसे काढायला मिळत होते. काही ग्राहकांनी तर रांगेमध्ये लागण्याऐवजी खरेदी लांबणीवर टाकली. याचा फटका बाजारपेठेला बसला. दुकानदारांनीही बँकांच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळीच्या कालावधीत बँकेला शुक्रवार वगळून चार दिवसांच्या सुट्या येत आहेत. याही कालावधीत ग्राहकांची गैरसोय होणार आहे. (नगर प्रतिनिधी)
बंद एटीएमचा गडचिरोली बाजारपेठेला फटका
By admin | Updated: November 10, 2015 02:01 IST