विद्यार्थीच कलावंतांच्या भूमिकेत : सर्च सामाजिक संस्थेचा निर्मितीत पुढाकारगडचिरोली : तालुक्यातील शिवणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने तंबाखूमुक्तीवर २० मिनीटांचा लघुपट तयार केला आहे. विशेष म्हणजे सदर लघुपटात विद्यार्थ्यांनीच कलाकाराची भूमिका स्वीकारली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण ३५ ते ४० टक्केपर्यंत आढळून येते. ही समस्या कमी करण्यासाठी दृकश्राव्य माध्यम परिणामकारक ठरू शकते. सर्च संस्थेच्या पुढाकारातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवणीच्या विद्यार्थ्यांनी कलाकाराची भूमिका साकारली आहे. या लघुपटामध्ये स्वत:चा मित्र कसा निवडावा, व्यसनी असल्यास काय परिणाम भोगावा लागतो, याबाबत सांगण्यात आले आहे. शेवटी विद्यार्थ्यांसाठी संदेश दिला आहे. शिवणी शाळेतील शिक्षिका उषा बागेसर यांनी विद्यार्थ्यांना अभिनय कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करून त्यांच्याकडून सराव करून घेतला. विद्यार्थी सुगद जगदीश खोब्रागडे, हिमांशू कवींद्र देशमुख, साक्षी आनंदराव गुरनुले, अनिकेत गजानन गावतुरे, सुयोग रमेश बावणे यांनी भूमिका साकारली आहे. २३ जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करून सहभागी बाल कलाकारांना व शाळेला प्रमाणपत्र देऊन सर्चतर्फे सन्मानित करण्यात आले. लघुपट तयार करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम वालदे यांनी मार्गदर्शन केले. लघुपटाची संकल्पना संतोष सावळकर व प्रभाकर केळझरकर यांनी माडली आहे. शुटिंगचे काम निराली चंदेल यांनी केले. तंबाखूमुक्तीवर जाणीवजागृती करण्यासाठी सर्वच शाळांमध्ये सदर लघुपट दाखविता येणार आहे. लघुपट तयार करण्यासाठी सर्चचे प्रमोद कोटांगले, प्रतीक वडमारे, रंजन पांढरे, दिलीप कुनघाडकर, डोंगरे, वाघमारे, गोंगले, हरडे, पेंदाम यांनी सहकार्य केले. बाल कलाकारांसह शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. (नगर प्रतिनिधी)
शिवणी शाळेचा तंबाखूमुक्तीवर लघुपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 01:24 IST