दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांना उपचारासोबतच ऑक्सिजनची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयाला २५ सिलिंडर ऑक्सिजनचा पुरवठा केला.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी संपूर्ण जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर देण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून ६ मे राेजी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाला २५ सिलिंडर आक्सिजन पुरवठा केला. यापुढेही १०० सिलिंडर ऑक्सिजन पुरवठा करण्याचा त्यांचा मानस आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी मदत हाेणार आहे. ग्रामीण रुग्णालयाला याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, भरत जोशी, अविनाश गेडाम, नंदू चावला, विकास प्रधान, अनिल उईके तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर डाॅ. प्रणय कोसे, सचिन शेळके व कर्मचारी उपस्थित होते.