गडचिरोली : सध्या जनता केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर कमालीची नाराज आहे. त्यामुळे पराभवाची मरगळ झटकून काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी बाला बच्चन यांनी केले. शुक्रवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महामंत्री मुन्नाभाई ओझा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, गडचिरोली विधानसभा प्रमुख अतुल मल्लेलवार, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प. सदस्य केसरी उसेंडी, चामोर्शी तालुकाध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बाला बच्चन म्हणाले, संपूर्ण देशात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पक्ष पुनर्बांधणीवर जोर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी कृती आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून काँग्रेसचे संघटन मजबूत करावे, असे ते यावेळी म्हणाले. प्रदेश काँग्रेसचे महामंत्री मुन्नाभाई ओझा यांनी बैठकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेस पक्षात संघटनेबाबत नवी संकल्पना मांडली असून ही संकल्पना गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यासाठी सहकार्य करावे, काँग्रेसचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी पक्षाची शिस्त कायम ठेवावी, असे सांगितले. यावेळी माजी आमदार डॉ. उसेंडी काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास थोडासा ढासळल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती इतर जिल्ह्याच्या तुलनेत वेगळी असल्याने पक्ष संघटनेत अडचणी येतात, असे असले तरी काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन चांगले आहेत, असेही डॉ. उसेंडी यावेळी म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रकाश इटनकर, पंकज गुड्डेवार, अतुल मल्लेलवार आदींनी आपले मत व्यक्त केले. बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनिल वडेट्टीवार, सुनिल पोरेड्डीवार, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, सिताराम ताराम, काशिनाथ भडके, शंकरराव सालोटकर, पं.स. सभापती देवेंद्र भांडेकर, सी. बी. आवळे, पी. टी. मसराम, प्रभाकर वासेकर, सुनिल खोब्रागडे, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे, सुरेश भांडेकर, दर्शना लोणारे, दर्शना मेश्राम, अमिता लोणारकर, नंदू वाईलकर, किशोर चापले, महादेव भोयर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पराभवाची मरगळ झटकून पक्ष बांधणीच्या कामाला लागा
By admin | Updated: February 28, 2015 01:33 IST