सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून २१ किमी अंतरावरील वडधम येथील एका विवाहित तरूणाने मोनोक्रोटोफास नावाचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. शंकर मोंडी जेट्टी (३४) असे मृतकाचे नाव असून त्याला दोन मुले आहेत. शेतावरून घरी आल्यावर शंकरने विषारी द्रव्य प्राशन केले, असे त्याच्या नातलगांनी सांगितले. रात्री १ वाजता त्याचा मृतदेह सिरोंचाच्या रुग्णालयात आणण्यात आला. येथील शवविच्छेदन गृहाचे बांधकाम दोन वर्षांपासून सुरू असून अद्यापही शासनाला हस्तांतरीत झाले नाही. त्यामुळे कुलूपकोंडा नसलेल्या अन्य घाणेरड्या इमारतीत मृतदेह रात्रभर ठेवून राखण करावी लागली. या अव्यवस्थेमुळे पोलीस पाटील तिरूपती सदी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवी येलपुला, माजी सरपंच राजन्ना जेट्टी, राकाँचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन आकुला यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. जिल्ह्यात अनेक रुग्णालयाला लागून असलेल्या शवविच्छेदन गृहांची व्यवस्था मृतकांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप देणारी आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयातही शवविच्छेदन कक्ष समस्याग्रस्त असल्याबाबत यापूर्वी लोकमतने लक्ष वेधले होते. (तालुका प्रतिनिधी)
कीटकनाशक प्राशन करून तरूणाचा मृत्यू
By admin | Updated: October 1, 2015 01:40 IST