वन महोत्सव : वन विभागाच्या मार्फत नियोजन; इतर यंत्रणा लावणार दोन लाख वृक्षगडचिरोली : १ जुलै ते ७ जुलै यादरम्यान वन महोत्सव राबविला जाणार आहे. या सात दिवसांच्या कालावधीत वन विभाग स्वत: पाच लाख वृक्ष व इतर यंत्रणांच्या मार्फत दोन लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी वन विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. काही ठिकाणी नर्सरी तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे विशेष महत्त्व आहे. वाढत्या औद्योगिकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते. यापूर्वीच्या शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. विद्यमान शासनाकडून वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. वन महोत्सवाच्या कालावधीत राज्यभरात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी हे उद्दिष्ट सात लाख एवढे आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीच्या कालावधीतच वृक्षांची लागवड करायची आहे. त्याचबरोबर नागरिकांना रोपटे उपलब्ध झाल्याशिवाय ते वृक्षांची लागवड करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन इतर यंत्रणांना दोन लाख वृक्ष मोफत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागावरच सोपविण्यात आली आहे. वृक्ष लागवडीसाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने त्या दृष्टीने वन विभागाने नियोजन केले आहे. (नगर प्रतिनिधी)रोपटे मिळणार मोफतपाच लाख वृक्ष वन विभाग स्वत: लावणार आहे. तर दोन लाख वृक्ष लावण्याची जबाबदारी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, शाळा, महाविद्यालये, खासगी सेवाभावी संस्था, शासकीय कार्यालये, शासकीय अधिकारी, कर्मचारी या यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे. या सर्व यंत्रणांना २९ जून पूर्वीच रोपवाटिकेतून रोप उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी वन विभागाकडे उपलब्ध असलेल्या वाहनांचा वापर केला जाणार आहे. रोपवनस्थळाजवळ विश्रांतीसाठी पेंडालही लावले जाणार आहे. मोफत वृक्ष मिळणार असल्याने लागवडीची संख्या वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
सात लाख वृक्षांची होणार लागवड
By admin | Updated: April 30, 2016 01:19 IST