गडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन व चर्चासत्राचे आयोजन गुरूवारी करण्यात आले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादर, रोहयो उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, विधी अधिकारी हरिष बांबोळे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना महेश आव्हाड यांनी मानवी हक्काबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संविधानात मानवी हक्कांबाबत असलेल्या तरतुदी, विविध कायदेशीर अधिकार व न्यायालयीन खटल्यांवर निर्देशित मानवाधिकार याबाबत मार्गदर्शन केले. गणेश बिरादर यांनी विशिष्ट मानवाधिकार म्हणून मान्यता मिळालेली घोषणापत्रातील ३० कलमांचे सविस्तर विवेचन केले. हरिष बांबोळे यांनी मार्गदर्शन करताना मानवी हक्कांबाबत असलेल्या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. मानवी व्यक्ती जन्मत: स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा, समान अधिकार आहेत. प्रत्येकाने एकमेकांशी बंधुत्त्वाच्या भावनेने आचरण करावे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन नगर पालिका प्रशासन विभागाचे अधिकारी चंदू प्रधान यांनी केले. यशस्वीतेसाठी हमीद सय्यद, किशोर भांडारकर, दिलीप डोर्लीकर, कोल्हटकर, नीतेश चिताडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
हक्कांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्र
By admin | Updated: December 12, 2015 04:01 IST