पोलिसांची उपस्थिती नगन्यच : कॉपी पुरविणाऱ्यांचा जोर वाढलागडचिरोली : १ मार्चपासून माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) सुरूवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६९ परीक्षा केंद्र विभागीय शिक्षण मंडळाने निश्चित केले आहे. दरवर्षी या परीक्षा केंद्रावर सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर दिली जाते. यंदा मात्र जिल्ह्यातील दुर्गम भागासह शहरी भागातही परीक्षा केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्याऐवजी गृहरक्षक (होमगार्ड) नियुक्त करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर गैर प्रकाराला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. ग्रामीण भागात परीक्षा केंद्राच्या सभोवताल काप्या पुरविणारे अनेक टोळके फिरताना दिसून येत आहे. जिल्ह्याच्या गडचिरोली तालुक्यात २ हजार ५५४, अहेरी तालुक्यात १ हजार ७०६, आरमोरी १ हजार ९०४, भामरागड ४७०, चामोर्शी ३ हजार २३९, देसाईगंज १ हजार ४३६, धानोरा९४१, एटापल्ली ८१५, कोरची ६६५, कुरखेडा १ हजार ७४१, मुलचेरा ९३९, सिरोंचा तालुक्यात ९३७ असे एकूण १७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. अनेक विद्यार्थी हे बाहेरगाववरून तालुका मुख्यालयाच्या व मोठ्या गावाच्या ठिकाणी राहून परीक्षा देण्यासाठी केंद्रावर येतात. यंदा विभागीय शिक्षण मंडळाने शाळेचा केंद्र प्रमुख तर दुसऱ्या शाळेचा उपकेंद्र प्रमुख नियुक्त केला आहे. परीक्षा परिसरात १४४ कलम लागू करून या परीक्षा केंद्राच्या सभोवताल विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोषक वातावरण करण्यासोबतच परीक्षा केंद्राच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे दिली जाते. दरवर्षी परीक्षा केंद्रावर पेपरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त यापूर्वी राहत होता. काही महिला पोलीस तर काही पुरूष पोलीसही केंद्रावर तैनात राहत होते. अनेक परीक्षा केंद्रावर पाच पेक्षा अधिक शाळांचे विद्यार्थी परीक्षेला आलेले आहेत. काही ठिकाणी आसन व्यवस्था कमी असल्याने एका बेंचवर दोन विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी बसविण्यात आले आहे. अशा स्थितीत परीक्षा केंद्राच्या परीसरात पालक, विद्यार्थ्यांचे मित्र व काही असामाजिक घटकही उपस्थित राहतात. हे घटक परीक्षेला आलेल्या विद्यार्थिनींना शाब्दिकदृष्ट्या त्रास देण्याचा प्रयत्नही करतात. तर ग्रामीण भागात व शहरी भागातील काही केंद्रांवर परीक्षा केंद्राच्या खिडकीतूनही उत्तराचे चिटोरे देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. या केंद्रांवर कुठेही पोलिसांची सुरक्षा असल्याचे दिसले नाही. गडचिरोली शहरातही अनेक केंद्रांवर केवळ गृहरक्षक परीक्षेच्या सुरक्षेसाठी हजर आहे. अहेरी येथे हिंदीच्या पेपरला भगवंतराव हायस्कूलमध्ये फक्त दोन महिला होमगार्ड ठेवण्यात आल्या होत्या. पण एकही पोलीस शिपाई येथे उपस्थित नव्हता. त्यानंतर पुन्हा एक पुरूष होमगार्ड तैनात करण्यात आला. मात्र पोलिसांचा बंदोबस्त कुठेही दिसला नाही. गुरूवारी दुपारी १२.३० वाजता हिंदीचा पेपर सुरू असताना गडचिरोली शहराच्या वसंत विद्यालयाच्या केंद्रावरही एक महिला गृहरक्षक उपस्थित होत्या. शाळेच्या मागील परीसरातील संरक्षण भिंतीजवळ दोन होमगार्ड तैनात असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. मात्र ते दोन होमगार्ड त्या परिसरात दिसून आले नाही. जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोलीच्या परीक्षा केंद्रावरही केवळ दोन गृहरक्षक तैनात असल्याचे दिसून आले. शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोलीच्या परीक्षा केंद्रावर एक पुरूष पोलीस व एक महिला गृहरक्षक हजर असल्याचे दिसून आले. देसाईगंज शहरातील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर केवळ तीन होमगार्ड परीक्षेच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याचे दिसून आले. होमगार्डला अनेक कॉपी बहाद्दर जुमानतही नाही, अशी परिस्थिती आहे. अलिकडेच वर्धा जिल्ह्यात आर्वी येथे परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला काही असामाजिक घटकांनी मारझोड केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांची परीक्षा काळात तैनाती राहणे हे गरजेचे ठरते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपी करणाऱ्यांपासून तसेच परीक्षा केंद्र परिसरात राहणाऱ्या असामाजिक तत्वांपासून त्रास होतो. त्यामुळे पोलीस हे बंदोबस्तासाठी हवेच, अशी मागणी अनेक पालकांनी लोकमतशी बोलताना परीक्षा केंद्र परिसरात केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
होमगार्डच्या भरवशावर परीक्षा केंद्राची सुरक्षा
By admin | Updated: March 4, 2016 01:22 IST