गडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पहिली ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची ५ व ६ एप्रिल रोजी ‘शैक्षणिक प्रगतीची चाचणी, संकलित मुल्यमापन क्रमांक-२’ ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र बहुतांश तालुक्यांमध्ये या चाचणीच्या प्रश्नपत्रिका कमी वितरित झाल्याने शिक्षक वर्गाचा गोंधळ उडाला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य शासनाकडून अनेक प्रयोग केले जात आहेत. यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. एवढ्या खर्चानंतरही विद्यार्थ्यांची खरच प्रगती झाली आहे काय हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ५ व ६ एप्रिल रोजी पहिली ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची ‘शैक्षणिक प्रगतीची चाचणी, संकलित मुल्यमापन क्रमांक-२’ ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या संस्थेने तयार केले आहेत. सदर पेपर परीक्षेपूर्वी जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. परिणामी गटसाधन केंद्रावरूनही प्रत्येक शाळांना कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या. त्यामुळे वेळेवर शिक्षकांचा गोंधळ उडाला. काही शाळांना मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यामुळे या शाळांमधून प्रश्नपत्रिका घेऊन त्या इतर शाळांना वितरित करण्याचे काम शिक्षण विभागातील कर्मचारी सोमवारी दिवसभर करीत होते. ज्या शाळांना कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. अशा शाळांमधील शिक्षकांना आता संबंधित प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स कॉपी काढण्यासाठी अतिरिक्त खर्च उचलावा लागणार आहे. विशेष म्हणजे, झेरॉक्सची व्यवस्था तालुकास्थळावरच उपलब्ध आहे. त्यामुळे तालुकास्थळावरील झेरॉक्सवर गर्दी वाढणार आहे. जिल्ह्यातील काही गावांचे अंतर तालुकास्थळापासून ४० ते ५० किमीचे आहे. तेवढ्या दूर अंतरावर येऊन झेरॉक्स काढण्याची कसरत करावी लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)सेमी इंग्रजी व फूल्ल इंग्रजी माध्यमामुळे गोंधळ४शैक्षणिक प्रगती चाचणी सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या १ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीची करण्यात आली. काही शाळांमध्ये सेमी इंग्रजी आहे. तर काही शाळांमध्ये इंग्रजी माध्यम आहे. मात्र या दोन्ही माध्यमांमध्ये गणित या विषयाचे माध्यम इंग्रजी असल्याने त्या पेपरवर माध्यम इंग्रजी असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे हे पेपर सेमी इंग्रजी माध्यमांसाठी नसावे, असा गैरसमज काही शिक्षकांमध्ये निर्माण झाला. वरिष्ठ स्तरावरून याबाबत समजावून सांगितल्यानंतर हा गोंधळ निपटला.४प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन व शैक्षणिक साधनांचा वापर केल्याने विद्यार्थी प्रगत झाल्याचे गोडवे गायले जात आहे. मात्र या चाचणीमुळे वस्तूस्थिती समोर येणार आहे.काही शाळांमध्ये कमी प्रश्नपत्रिकांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे ज्या शाळांना जास्त प्रश्नपत्रिका मिळाल्या आहेत, अशा शाळांनी जवळपासच्या शाळेला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. इतर जिल्ह्यातूनही प्रश्नपत्रिका मागितल्या आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानंतर त्या प्रत्येक गटसाधन केंद्रावर नेऊन दिल्या जातील. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. - माणिक साखरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. गडचिरोली
संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिकांचा तुटवडा
By admin | Updated: April 5, 2016 03:54 IST