समाेरच्या व्यक्तीला सावध करण्यासाठी प्रामुख्याने हाॅर्नचा वापर केला जाते. वाहनाच्या प्रकारानुसार हाॅर्नचा आवाज किती असावा, ताे कसा असावा याबाबत परिवहन विभागाने नियम ठरवून दिलेले आहेत. या नियमांचे बहुतांश वाहनधारक पालन करतात. मात्र काही विक्षिप्त स्वभावाचे युवक आपल्या वाहनाला विचित्र आवाज येईल, अशा प्रकारचे हाॅर्न लावतात. तसेच या हाॅर्नचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असतो. अशा प्रकारचे कर्कश आवाजाचे हाॅर्न अगदी जवळ येऊन वाजविल्यास नागरिकांच्या कानाचे पडदे फाटून कायमचे बहिरेपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पाेलिसांना आहेत. मात्र कारवाईच केली जात नसल्याने वाहनांना असे हाॅर्न लाऊन वाजविण्याचे प्रकार वाढले आहेत.
बाॅक्स
वाहन पकडताना अडचण
सर्वसामान्य वाहनधारक आपल्या वाहनाचा हाॅर्न बदलत नाहीत. मुख्यत्वे करून युवक वर्ग रेसिंग बाइकला कर्णकर्कश आवाज असलेले हाॅर्न लावतात. त्यामुळे त्यांना पकडणे कठीण हाेते. तसेच शहरातून त्यांचा पाठलाग करताना त्याचा किंवा वाहतूक पाेलिसांचा अपघात हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यताेवर वाहतूक पाेलीस पाठलाग करून कारवाई करीत नाहीत. ही बाब वाहनधारकांना माहीत असल्याने चाैकातही खुलेआम कर्णकर्कश हाॅर्न वाजविले जातात.
घाबरविणारे हाॅर्न लावणारे माेकाट
काही वाहनांना एखाद्या जनावराप्रमाणे आवाज काढणारे हाॅर्न लावले जातात. अशा प्रकारच्या हाॅर्नमुळे चालत असलेल्या किंवा दुसऱ्या दुचाकीवरील व्यक्तीचे लक्ष विचलित हाेऊन त्याचा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
क्रमांक नाेंद करून कारवाई शक्य
धावत्या वाहनधारकाला पकडणे अशक्य आहे. मात्र ज्या वाहनांना कर्णकर्कश हाॅर्न लावला आहे, अशा वाहनाच्या क्रमांकाची नाेंद करून संबंधिताला नाेटीस पाठविणे शक्य आहे. वाहनाच्या क्रमांकाची नाेंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात असल्याने त्यावरून मालकाचा शाेध घेणे शक्य आहे.
सायलेन्सर काढून चालविली जातात वाहने
इंजिनमधून निघणाऱ्या आवाजाची तीव्रता कमी करणे हे सायलेन्सरचे मुख्य काम आहे. मात्र काही युवक दुचाकीचे सायलेन्सर काढतात. त्यामुळे माेठा आवाज निघतो. अशा वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण हाेण्याबराेबरच हवेचेही प्रदूषण हाेते.