पूजन व महाप्रसाद : कमलापूर व बालमुत्यमपल्लीत शेकडो भाविकांची गर्दी कमलापूर/अंकिसा : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या समक्का-सारक्का देवीच्या यात्रेला कमलापूर व बालमुत्यमपल्ली येथे बुधवारपासून प्रारंभ झाला. या यात्रेत तालुक्यासह विविध भागातून भाविकांची गर्दी तीन दिवस लोटली. तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. कमलापूर येथे बुधवारपासून समक्का-सारक्का मंदिरात यात्रेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी समक्का देवीचे आगमन, पूजा-अर्चा, भजन कार्यक्रम करण्यात आला. गुरूवारी बोनालू, महाप्रसाद वितरण तसेच पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. शुक्रवारी भजन, कीर्तन कार्यक्रम घेण्यात आला. या यात्रेच्या आयोजनासाठी अखिल नाट्य, क्रीडा, कला व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथून तीन किमी अंतरावरील बालमुत्यमपल्ली येथे तीन दिवसीय समक्का-सारक्का यात्रेचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी बुधवारी गंगा स्नान, दुसऱ्या दिवशी वनम व तिसऱ्या दिवशी बोनालू कार्यक्रम घेण्यात आला. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील शेकडो भाविक दाखल झाले होते. यात्रेत राजकीय पुढाऱ्यांनीही गुरूवारी भेट देऊन दर्शन घेतले. यात्रेच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थानी सहकार्य केले. (वार्ताहर)
समक्का-सारक्का यात्रेत जनसागर
By admin | Updated: February 12, 2017 01:32 IST