बोरीचक शाळेतील प्रकार : शाळा समितीने केला भांडाफोड वैरागड : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत वडधा केंद्रातील बोरीचक येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी वापरावयाचा तांदूळ हा रेती मिश्रीत पुरविण्यात आला. सदर प्रकार शाळा व्यवस्थापन समितीच्या भेटीदरम्यान मंगळवारी उघडकीस आला. यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या वाढावी, एकही मूल शाळाबाह्य राहू नये, या उदात्त हेतूने राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित केली. वडधा केंद्रातील बोरीचक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सोय असून या शाळेत एकूण ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १८ जानेवारी रोजी मंगळवारला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टिकाराम खेवले, उपाध्यक्ष यामिना पिपरखेडे, सदस्य नरेंद्र खेवले, डोमा सेलोटे, बाबुराव सेलोटे, उत्तरा खेवले, मनीषा खेवले, मंदा राऊत, नंदा चापले यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. दरम्यान त्यांनी शालेय पोषण आहारासाठी वापरला जाणाऱ्या तांदळाची चौकशी केली असता, तांदळामध्ये ५० टक्के रेती असल्याचे निदर्शनास आले. रेती मिश्रीत तांदळाचा पुरवठा झाल्याने समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी रोष व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, जानेवारी महिन्याचा तांदूळ पुरवठा शाळेला अद्यापही झाला नाही. त्यामुळे डार्ली जिल्हा परिषद शाळेतून पोषण आहार शिजविण्यासाठी ५० किलो तांदूळ उसणवार आणले, अशी माहिती पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिली. सदर रेती मिश्रीत तांदूळ आजच संपला असून उद्या भोजनासाठी तांदूळ नसल्याची माहिती त्यांनी दिली.
रेती मिश्रीत तांदळाचा पुरवठा
By admin | Updated: January 19, 2017 01:58 IST