गडचिरोली : १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीवर नक्षली सावट होते. दरम्यान नक्षल्यांकडून घातपाताच्या कारवाया वाढण्याची शक्यता असतांनादेखील भामरागड तालुक्यात ६२.४३ टक्के मतदान झाले आहे. या तालुक्यात सर्वाधिक मतदान हिंदूर केंद्रावर ८० टक्के झाले असून सर्वाधिक कमी मतदान बिनागुंडा केंद्रावर ३२.८१ टक्के झाले आहे. एकंदरीत भामरागड तालुक्यात मतदारांच्या उत्साहामुळे नक्षली सावटात बॅलेट जोरात चालल्याचे दिसून आले. शहरी भागातील मतदार संघाच्या तुलनेत भामरागड या अतिदुर्गम नक्षलप्रभावित तालुक्यात मतदान चांगल्या प्रकारे झाले आहे. नक्षलवाद्यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भामरागड तालुक्यातील अनेक दुर्गम गावात बॅनर बांधले होते. तसेच अनेक गावात पत्रके टाकून मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन नक्षल्यांनी केले होते. सुरूवातीपासूनच भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांची भीती होती. मात्र या तालुक्यातील मतदारांनी लोकशाहीला पसंती दिल्यामुळे या तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली. अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड तालुक्यात एकुण १९ हजार ९०० मतदार आहेत. यापैकी १२ हजार ४५४ नागरिकांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला. नक्षलवाद्यांच्या आवाहनाला व भीतीला न जुमानता भामरागड तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलीस प्रशासनाच्या सुरक्षिततेत मतदान केले. यामुळे या तालुक्याची मतदानाची टक्केवारी ६२.४३ या आकड्यापर्यंत गेली. पोलीस जवानांनी या तालुक्यात दिवसरात्र एक करून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण केली. नागरिकांमध्ये मनपरिवर्तन घडवून आणले. त्यामुळे या तालुक्यात ६२.४३ टक्के मतदान झाल्याची प्रतिक्रिया एसडीपीओ विशाल ठाकुर यांनी दिली आहे.
नक्षली दहशतीच्या सावटात बॅलेट चालला
By admin | Updated: October 16, 2014 23:24 IST