राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा : ज्योती चव्हाण यांची उपस्थिती आरमोरी : युवारंग स्पोर्ट अॅन्ड सोशीयल क्लब आरमोरीच्या वतीने पर्यावरण जनजागृतीच्या निमित्ताने रविवारी आरमोरी येथे राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरासह जिल्ह्यातील सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांना विदर्भ एक्सप्रेस, आंतरराष्ट्रीय धावपट्टू ज्योती चव्हाण हिने स्पर्धेला हजेरी लावून प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत ५० ते ७५ वर्षावरील वृध्दांसह मोठ्या संख्येने तरूणाई धावली. आरमोरी बर्डी येथील वडसा टी पार्इंटवर आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय धावपट्टू ज्योती चव्हाण, पोलीस निरिक्षक महेश पाटील, रवींद्र बावणथडे यांनी केले. स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ त्यांनी यावेळी केला. सदर स्पर्धा विविध पाच गटात घेण्यात आली. या स्पर्धेत युवक, युवती, शालेय विद्यार्थी व वृध्दांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. मॅराथॉन स्पर्धेनंतर बक्षिस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र बावणथडे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक महेश पाटील आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चव्हाण, सत्यनारायण चकीनारपुवार, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. साईनाथ अद्दलवार, दौलत धोटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र व रोपटे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत बावणथडे, संचालन राहूल जुआरे यांनी केले. तर आभार मुकूल खेवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत बावणथडे सुनिल नंदनवार, मुकूल खेवले, राहूल जुआरे, मनोज गेडाम, सुरज हजारे, फिरोज पठाण, प्रफुल्ल खापरे आदींनी सहकार्य केले. सदर मॅराथॉन स्पर्धा पाहण्यासाठी आरमोरीकरांनी बर्डी येथील वडसा टी पार्इंट परिसरात प्रचंड गर्दी केली होती. युवारंग क्लबच्या वतीने मागील वर्षीपासून मॅराथॉन स्पर्धा घेतली जात आहे. (वार्ताहर) युवकांनी क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे ाडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात युवारंगने राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा घेऊन युवा खेळाडूंना नवी ऊर्जा व व प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. अशा स्पर्धा केवळ मोठ्या शहरातच घेतल्या जातात. त्यापेक्षाही सुंदर स्पर्धा आरमोरीसारख्या लहानशा शहरात घेण्यात आल्याचा मला आनंद आहे. सदर स्पर्धेत युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. यापुढेही गडचिरोली जिल्ह्यातील युवक, युवतींनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन करिअर घडवावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय धावपटू विदर्भ कन्या ज्योती चव्हाण हिने केले.
वृद्धांसह तरूणाई धावली
By admin | Updated: February 27, 2017 01:14 IST