जीवित हानी नाही : १५ वर्षांपूर्वीची होती इमारत, अतिवृष्टीने झाले नुकसानकमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिपावसामुळे महिला वार्डाचे छत काही प्रमाणात कोसळले. त्यावेळी एक महिला रूग्ण भरती होती. मात्र सुदैवाने तिला कोणतीही इजा झाली नाही. कमलापूर परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी कमलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना होऊन १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही अजुनपर्यंत स्वतंत्र इमारत बांधण्यात आली नाही. एका गोदामाप्रमाणे बांधलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चालविला जात आहे. या परिसरातील एकमेव मोठे रूग्णालय असल्याने या रूग्णालयात दर दिवशी ४० ते ५० रूग्ण उपचारासाठी येतात. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत नऊ उपकेंद्र आहेत. गंभीर स्थितीत रूग्णालयात आलेल्या रूग्णाला भरतीही केले जाते. मात्र रूग्णालयाची इमारत जीर्ण असल्याने रूग्णांसह येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इमारत गळत असल्याने रात्रभर थांबणे कठीण होत चालले आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने छत कोसळले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. संपूर्ण इमारतच जीर्ण झाली असून कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर इमारत दुरूस्त करण्याबाबत गावकरी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. मात्र अजुनपर्यंत निधी उपलब्ध झाला नाही. इमारतीची अवस्था लक्षात घेता, नवीन इमारतच बांधणे आवश्यक आहे. या भागाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी इमारत बांधकामाविषयी पाठपुरावा करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. इमारतीची तत्काळ दुरूस्ती न केल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)
कमलापूर आरोग्य केंद्राचे छत कोसळले
By admin | Updated: June 24, 2015 02:32 IST